केरळमध्ये ६५ लाख लोकांना करोनाची शक्यता; होऊ शकतात २ लाख २७ हजार मृत्यू; IMAचं पत्र!

भारतात करोनाचा फैलाव धिम्या गतीने होत असला, तरी महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोचीन शाखेने एक धक्कादायक पत्र केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या पत्रामध्ये आयएमएनं केलेला धक्कादायक दावा केरळ आणि उर्वरीत भारतासाठी धोक्याची घंटा ठरणारा आहे. आयएमएनं केलेल्या दाव्यानुसार केरळमध्ये सुमारे ६५ लाख लोकांना करोनाची लागण होऊ शकते आणि त्यातल्या २ लाख २७ हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानुसार केरळमधल्या वैद्यकीय सुविधांची आधीच तजवीज करून ठेवणं अत्यावश्यक आहे, असा इशारा या पत्रामध्ये देण्यात आला आहे.

या पत्रामध्ये आयएमएनं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएनं पत्रात असं म्हटलं आहे की एक करोनाग्रस्त व्यक्ती दोघांना करोनाग्रस्त करू शकते. दोन व्यक्ती चौघांना करोना देऊ शकतात. त्यामुळे योग्य ती पावलं उचलण्यासाठी केलेली दिरंगाई धरण फुटून गावात पूर आल्यानंतर दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार होईल. यासंदर्भात समस्येचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर सार्वजनिक हितासाठी हे पत्र पाठवण्यात आलं आहे, असं कोचीन शाखेचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

डायमंड प्रिन्सेस क्रूज शिपवर अडकलेल्या ३ हजार ७०० प्रवाशांपैकी ७०० प्रवाशांना करोनाची लागण झाली. त्यामुळे करोनाची लागण होण्याचं सरासरी प्रमाण १९ टक्के आहे. संपूर्ण केरळच्या लोकसंख्येचा विचार केला, तर हा आकडा ६५ लाख रुग्णांपर्यंत पोहोचतो. त्यापैकी १५ टक्के, म्हणजेच ९ लाख ४० हजार रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागेल. त्यापैकी २५ टक्के, म्हणजेच २ लाख ३५ हजार १२५ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर करोनाची लागण झाल्यास किमान २ लाख २७ हजार रुग्णांचा मृत्यू ओढवू शकतो. त्यातही सर्वात कमी प्रमाण जरी आपण गृहीत धरलं, तरी ७ टक्के दरानुसार किमान २४ लाख लोकांना करोनाची लागण होऊ शकते. आणि इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी राज्यात सध्या असलेली आरोग्य सुविधा पुरेशी नाही, असं या पत्रामध्ये आयएमएकडून नमूद करण्यात आलं आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News