H3N2 Virus : नवा विषाणू किती धोकादायक? H3N2 इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा संबंध? वाचा सविस्तर

H3N2 Virus : देशात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सर्दी-खोकला, ताप या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.

H3N2 Influenza And Covid-19 : भारतात एकीकडे कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग घटताना दिसत आहे. मात्र, नव्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. याची लक्षणं म्हणजे, सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब.

सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ:
सध्या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये विशेषत: खोकल्याची समस्या सर्वसामान्य आहे. अनेकांना खोकल्याच्या समस्येनं बेजार केलं आहे. या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसमुळे आरोग्य प्रशासनही चिंतेत आहेत. रुग्णालयात तसेच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

H3N2 इन्फ्लूएंझा आणि कोरोनाचा संबंध काय?:
एका शास्त्रज्ञानं मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू आणि इन्फ्लूएंझा या दोन्ही आजाराची लक्षणं साधारणपणे एकसारखीच आहेत.  या विषाणूचा संसर्ग वेगानं पसरत आहे. इन्फ्लूएंझा संशयित रुग्णांच्या नमुन्यांचीही कोरोना चाचणी केली जात असल्याची माहिती शास्त्रज्ञानं दिली आहे.

‘मूळ विषाणूतील बदलामुळे रुग्णांमध्ये वाढ’:
इंस्टिट्यूट ऑफ इंटर्नल मेडिसिन एज्युकेशनचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, दरवर्षी या काळात H3N2 विषाणूचा प्रसार होतो. H3N2 विषाणू हा H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे मूळ विषाणूचाच बदललेला प्रकार आहे. विषाणू परिस्थितीनुसार स्वत: मध्ये बदल करतात. यामुळे ते अधिक धोकादायक बनतात.  या म्युटेशनमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, “वर्षाच्या या वेळी जेव्हा हवामान बदलतं तेव्हा इन्फ्लूएंझा होण्याची शक्यता जास्त असते. आता कोरोना नसल्यामुळे लोकांनी मास्क घालणंही बंद केले आहे. ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, विषाणू अधिक वेगाने पसरत आहे.” गुलेरिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना हे सांगितलं आहे.

‘पुन्हा कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज’:
H3N2 इन्फ्लुएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. आरोग्य प्रशासनाने या आजारांच्या रुग्णांवर लक्ष ठेवणं आणि कोरोना चाचणी वाढविण्याचे निर्देश द्यावं, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने 30 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांचं निरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

H3N2 व्हायरसपासून संरक्षण कसं कराल?

  • फ्लूवरील वार्षिक लस घ्या.
  • हात नियमितपणे स्वच्छ धुवा. विशेषत: टायलेट नंतर, जेवणाआधी तसेच चेहरा किंवा नाकाला स्पर्श करण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा.
  • शक्या असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
  • आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
  • स्वत: अँटीबायोटिक घेणं टाळा. डॉक्यरांनी अँटीबायोटिक दिल्यास सांगितल्याप्रमाणेच त्याचं सेवन करा.

Loading