पुणे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५ वर पोहोचली आहे. अशा परिस्थिती खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला आहे.
दरम्यान, कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, अंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातही संसर्गग्रास्तांसाठी नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात हा कायदा लागू केल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी दिले. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांची तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.