जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा पुण्यानंतर मुंबईतही शिरकाव झाला आहे. पुण्याच्या कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबतच्या 2 सहप्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांनी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीची ठिकाणं टाळा आणि मास्कचा वापर करा.
मुंबईत करोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबईतील सहा संशयितांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने स्पष्ट केलं आहे. दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील 2 सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
राज्यातील एकूण करोनाची लागण झालेल्यांची संख्या ७ वर तर भिवंडीतही कोरोनाचा एक संशयित रूग्ण
भिवंडीतील 60 वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती भिवंडीत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर महिलेमध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून आली.