जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने जगापासून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने बुधवारी सर्व देशांचे व्हिसा रद्द केले आहेत. हे व्हिसा येत्या 15 एप्रिल २०२० पर्यंत रद्द असणार आहेत. म्हणजे जगातील कुणीही व्यक्ती आता भारतात येऊ शकणार नाही. सामान्य परदेशीयांना भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्या रात्री 12 पासून परदेशीयांवर हे निर्बंध लागू होतील.
जर कुणी भारतीय व्यक्ती भारतात परत येऊ इच्छितो तर त्याला तपासणी करवून घ्यावी लागेल. त्यानंतर 14 दिवसांपर्यंत त्याला निरिक्षणाखाली राहावं लागेल, असेही सरकारने म्हंटले आहे. मात्र, राजनैतिक अधिकारी, संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे. जागतिक संघटनांच्या अधिकाऱ्यांना भारतात येता येणार आहे. शिवाय, व्हिसा फ्री देशांतली ये-जा सुद्धा 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
कोरोनासंबंधी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे
- 13 मार्चपर्यंत जारी करण्यात आलेल्या सर्व व्हिसा आणि ई-व्हिसाला रद्द करण्यात आलं आहे. हे व्हिसा 15 एप्रिलपर्यंच रद्द राहतील. पण, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, डिप्लोमॅट, रोजगार, प्रोजेक्ट व्हिसासह इतर शासकीय अधिकाऱ्यांना भारतात प्रवेश असेल.
- जे परदेशी नागरिक सध्या भारतात आहे, त्यांचा व्हिसा जारी राहील. जर त्यांना काउन्सलर एक्सेसची गरज असेल किंवा त्यांना त्याच्या व्हिसाची मुदत वाढवायची असेल तर ते FRRO ला संपर्क करु शकतात.
- OCI कार्ड होल्डर्सला जो मोफत व्हिसा ट्रॅव्हलचा फायदा मिळत होता. त्यालाही 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलं आहे.
- जर कुठल्या परदेशी नागरिकाला भारतात यायचं असेल तर तो त्याच्या देशातील भारतीय दूतावासमध्ये संपर्क करु शकतो.
- चीन-इटली-इराण-कोरिया-स्पेन-जर्मनीसह इतर सर्व देशांची यात्रा करुन परतणाऱ्या भारतीयांची स्क्रिनिंग केली जाईल. यांना 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल.
- वैद्यकीय तपासणीनंतरच भू-सीमेपासून ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत प्रवेश मिळू शकेल.
- जर एखाद्या भारतीय नागरिकाला परदेश दौरा करायचा असेल, तर त्याने त्याचे नियोजन अशा पद्धतीने करावे जेणेकरुन त्यांना 14 दिवसापर्यंत निरीक्षणाखाली ठेवता येईल.
- भारत सरकार नागरिकांना आवाहन करते की, जर आवश्यक असेल तरच कुठल्या दुसऱ्या देशाची यात्रा करा.