नवी दिल्ली : काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेवर कोण जाणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. 45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत.
राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. सातव यांच्या रुपाने संसदेच्या वरच्या सभागृहात काँग्रेसचा आवाज पुन्हा कणखर होताना दिसेल.
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान ‘वेट अँड वॉच’वर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने फौजिया खानही आज उमेदवारी अर्ज भरत आहेत.