लोक जेव्हा बोलत असतात त्यावेळी त्यांच्या तोंडातून काही सूक्ष्म द्रव्य अथवा तुषार बाहेर पडतात आणि ते जवळपासच्या पृष्ठभागावर बसतात किंवा हवेत राहतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा CDC ने केला आहे.
वॉशिग्टन : आपण ज्या वेळी बोलतो त्यावेळी आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल एंड प्रिवेन्शन अर्थात CDC ने केला आहे. आपल्या तोंडावाटे अत्यंत सूक्ष्म असे द्रव्य कण बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात किंवा जवळच्या पृष्ठभागावर बसतात. नंतर त्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो असा दावा CDC ने केला आहे.
CDC ने शुक्रवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, आपण बोलताना आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या मार्फत कोरोनाचा प्रसार होत असल्याचं स्पष्ट झालंय. तोंडावाटे निघणारे मोठे द्रव्य कण हे काही सेकंद ते मिनीटे हवेत राहतात आणि नंतर नष्ट होतात. पण सूक्ष्म कणांचं वेगळं आहे. ते काही मिनीटे ते काही तास हवेमध्ये वा पृष्ठभागावर राहतात. त्यामुळे सूक्ष्म कणांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.
द लॅन्सेन्टच्या दाव्याला पृष्टी
कोरोना अर्थात SARS-CoV-2 व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचं प्रबळ पुराव्यातून सिद्ध झालं असल्याचं संशोधन गेल्या महिन्यात ‘द लॅन्सेट’ या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कोरोना हवेतून परसतोय आणि त्याचे सातत्याने पुरावे संशोधकांना मिळत आहेत असं त्याच्या एका निवेदनात सांगण्यात आलं होतं. आता अमेरिकेच्या सीडीसीच्या दाव्याने द लॅन्सेटच्या या मताला पृष्टी मिळाली आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा या देशातील सहा तज्ज्ञांनी सांगितलंय की, कोरोना हवेतून पसरत असल्यानेच जगभरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांना त्याच्यावर अद्याप नियंत्रण ठेवता येणं शक्य झाले नाही. कोरोनाचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होतोय या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत. या आधीही काही वैज्ञानिकांनी दावा केला होता की कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतोय. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते.