नाशिक: भरधाव ऑडी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्र्यंबकर रोडवरील एबीबी सर्कलवर घडली. या भीषण अपघातात दुचाकीचा हॅन्डल तुटला तर कारचे नुकसान झाले. दिनकर पोपट खैरनार (वय ४४ रा. श्रीनिवास पार्क, शिवाजीनगर, नाशिक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दिनकर खैरनार यांचा भाउ भारत खैरनार यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खैरनार हे अपाची दुचाकी (एमएच १५ बीव्ही ९४७३)वरुन एबीबी सर्कल येथून जात होते. त्यावेळी संशयित कारचालक ( एमएच ४१ एडी ९९०९) याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक खैरनार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. कारचालकास खैरनार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेवून आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. दिनकर खैरनार हे व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाउ व भावजयी असा परिवार आहे.
कारचालकच दिनकरला घेवून रुग्णालयात
अपघातानंतर संशयित कारचालकाने उपचारासाठी दिनकर खैरनार यांना जिल्हा रुग्णालायात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. ही बाब कारचालकाला समजली. मयताचे नातेवाईक येण्याआधीच त्याने रुग्णालयातून पलायन केले.