आता ATM मधून रक्कम काढणं महागणार, एटीएम कॅश विड्रॉल चार्ज, कार्ड्सचं शुल्क वाढणार
नवी दिल्ली: तुम्ही एटीएम किंवा बॅंक शाखेमधून विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक वेळा रक्कम काढणार असाल तर त्यासाठी तुम्हाला आता अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. कारण आता एटीएममधून कॅश काढणं अजून महागणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वेळा ग्राहकांनी एटीएममधून कॅश काढल्यास संबंधित बॅंका यावर शुल्क आकारणार आहेत. नुकतेच ऑटोमेटेड टेलर मशीनवरील शुल्क 21 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) बँकांना दिली आहे. हे सुधारित दर जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.
ग्राहक आपल्या बॅंकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करु शकतात. यात आर्थिक (Financial) आणि गैरआर्थिक (Non Financial) अशा दोन्ही व्यवहारांचा समावेश आहे. यापेक्षा अधिक प्रमाणात ट्रान्झॅक्शन केल्यास प्रति ट्रान्झॅक्शन अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागणार आहेत. कॅश काढण्यासाठी दुसऱ्या बॅंकांच्या एटीएमचा वापर करणाऱ्या मेट्रो सिटीतील ग्राहकांना 3 तर नॉन मेट्रो सिटीतील ग्राहकांना 5 फ्री ट्रान्झॅक्शनसाठी परवानगी आहे.
1 ऑगस्टपासून लागू होणार हे नवे नियम:
जून 2019 मध्ये, आरबीआयने एटीएम ट्रांजेक्शनच्या इंटरचेंज (Interchange) रचनेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच एटीएम शुल्काचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आरबीआयने एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज फी प्रत्येक फायनान्स ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपयांवरुन 17 रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच नॉन-फायनान्स ट्रान्झॅक्शनसाठी ही फी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे नवे शुल्क 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, इंटरचेंज फी म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डव्दारे पेमेंट करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बॅंका घेत असलेले शुल्क होय.
एसबीआयने सेवा दरात केले बदल:
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) अलीकडेच म्हणजे जुलैच्या सुरुवातीस एटीएम आणि बॅंक शाखांमधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा दरामध्ये बदल केला आहे. एसबीआयने बीएसबीडी खातेधारकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीएसबीडी खातेदारांना आता एटीएम किंवा बॅंक शाखांमधून मर्यादित म्हणजेच केवळ 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. या मर्यादेनंतर जर एखादा ग्राहक एटीएम किंवा बॅंक शाखांमधून पैसे काढणार असेल तर त्यास सेवा शुल्क म्हणून प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 15 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. एसबीआय व्यतरिक्त अन्य बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी देखील हा नियम लागू असेल.