हातावर स्टॅम्प मारलेले चौघं रेल्वेनी फिरत होते; पालघरमध्ये ट्रेनमधून उतरविले

परदेशातून आलेले नागरिक किंवा राज्यात आढळलेले संशयित करोना रुग्णांच्या हातावर टँम्प मारले जातात. या टँम्प मारलेल्या नागरिकांनी होम क्वॉरंटाइनमध्ये राहणे गरजेचे असते. परंतु पालघर रेल्वे स्थानकावर चार संशयित करोना रुग्णांना उतविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे चौघेही जर्मनीतून आले होते. मुंबई विमानतळावर उतरून ते गरीब रथ या ट्रेनने मुंबई ते सूरत असा प्रवास करत होते.

यावेळी काही प्रवाशांनी त्यांच्या हातावर करोना रुग्णांसंदर्भातला टँम्प पाहिला. प्रवाशांनी याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर ट्रेन पालघर स्थानकावर थांबवून चौघांनाही गाडीमधून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

परदेशातून मुंबई विमानतळावर आल्यावर त्यांची करोना विषाणूची तपासणी करण्यात आली. त्यावेळी चौघांनाही करोनाची बाधा झालेली नव्हती. तरीही त्यांना १४ दिवस होम क्वॉरंटाइन घेण्यासाठी सांगितले होते. यावेळी, पालघरमध्ये डॉक्टरांनी त्यांची पुन्हा तपासणी करून त्यांना पुढील प्रवास करण्याची परवानगी दिली.