नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात १२ मे पासुन कडक निर्बंध लागू केले असले तरीही नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम होता. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा या निर्बंधांमधील ठळक वैशिष्ठ्ये अधोरेखित केली आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबत कळविले आहे. किराणा दुकाने ग्राहकांसाठी बंद राहतील. परंतु किराणा दुकानाचे कर्मचाऱ्यामार्फत घरपोच किराणा वितरण सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत करण्याची परवानगी राहील.
ऑनलाइन पद्धतीने जीवनावश्यक बाबी प्राप्त करून घेणेस कोणताही प्रतिबंध असणार नाही. दुधाचे अत्यंत नाशवंत स्वरूप विचारात घेता घरपोच विक्री पूर्णतः शक्य नाही अशा बाबतीत दूध विक्री सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल अशा ठिकाणावरून करता येईल. दूध विक्री व भाजी विक्रीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमाचे उल्लंघन झाल्यास त्या ठिकाणची विक्री पुढील दहा दिवसांकरिता ताबडतोब बंद करण्यात येईल.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होत नसल्याने बाजार समितीचे आवार बंद राहील. परंतु त्याच वेळी शेतकऱ्याकडील भाजीपाला व अन्य माल स्वीकृत करण्यासाठी विकेंद्रित व्यवस्था संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापित करेल. शहरांतर्गत अथवा राज्यांतर्गत शेतमाल वाहतुकीस व विक्रीस कोणताही प्रतिबंध असणार नाही.
उद्योगधंद्यांच्या बाबतीत इन सीटू उद्योग सुरू ठेवणे बाबत परवानगी आहे. इन सीटू चा अर्थ ज्या उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते त्यांनी तशी व्यवस्था करावी. ज्या उद्योगांमध्ये अशी व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर अशा काही उद्योजकांनी एकत्र येऊन त्या उद्योगाच्या दोन किलोमीटर परिसरातील निवास योग्य इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची सोय करण्यास मुभा राहील. कंपनीच्या वाहनातून त्यांची पॉईंट टू पॉईंट ने-आण करता येईल. कमीत कमी मनुष्यबळात या कंपन्या सुरू ठेवणे व सर्व कर्मचारी यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील.
औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्र यामध्ये संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच निवासी भागातून औद्योगिक क्षेत्राकडे जाण्याच्या नावाखाली अन्य नागरिकांनी देखील मुक्त संचार करू नये या दृष्टीने ही सूचना देण्यात आलेली आहे.
अन्न, औषध व ऑक्सिजन निर्मिती कंपन्याना वरील निर्बंधामधून वगळेले असून त्या पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. परंतु सर्व कर्मचारी यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील. लग्नाचे समारंभ कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास पूर्णपणे बंदी राहील. पाच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदवता येतील.
या अधिसूचनेत ज्या बाबींचा उल्लेख नाही त्या संदर्भात शासनाच्या अधिसूचनेत यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व तरतुदी यापुढेही लागू राहतील. कोणत्याही अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना त्या कारणाचे पुष्ट्यर्थ स्वयंस्पष्ट सबळ पुरावा सोबत ठेवणे क्रमप्राप्त राहील.
टीप: ही अधिसूचना अत्यंत सविस्तर व स्वयंस्पष्ट आहे. या अधिसूचनेची तसेच या पूर्वीच्या अधिसूचनेच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारचा संभ्रम असल्यास या अधिसूचना वाचूनच पुढील कार्यवाही करावी.