एका विद्यार्थ्याने एमबीएचं (MBA) शिक्षण सोडून स्वत: चहा विकण्याचं काम सुरू केलं आहे. ‘डिग्री मॅटर करत नाही, तर नॉलेज मॅटर करतं. मी चहावाला आहे आणि यावर माझं प्रेम आहे’ असं तो म्हणतो.
नवी दिल्ली : विद्यार्थी असताना प्रत्येकालाच आपण मोठं होऊन खूप पैसे कमावावेत, नाव कमवावं असं वाटत असतं. चांगली डिग्री, नोकरी, घर, गाडी अशी अनेक स्वप्न अनेकांची असतात. पण एका विद्यार्थ्याने एमबीएचं (MBA) शिक्षण सोडून स्वत: चहा विकण्याचं काम सुरू केलं आहे.
प्रफुल बिलौरे असं एमबीएचं शिक्षण सोडणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. Humans Of Bombay सह त्याने आपल्या आयुष्याची कहाणी शेअर केली आहे. त्याने सांगितलं की CAT ची परीक्षा नापास झाल्यानंतर तो अतिशय निराश झाला होता. त्याला या सगळ्यातून ब्रेक घेऊन हे जग पाहायचं होतं. परंतु सामान्य कुटुंबातील असलेल्या प्रफुलच्या पालकांनी त्याला चांगल्या शिक्षणासाठी असं करू दिलं नाही.
20 वर्षांचा असताना प्रफुल इंटर्नशिपदरम्यान सेव्हिंग करू लागला. यादरम्यान तो खूप फिरलाही. तो अहमदाबादमध्ये आला आणि त्याने तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. प्रफुल या काळात पार्ट टाईम जॉबही करू लागला. त्याने एमबीएची डिग्री घ्यावी अशी त्याच्या पालकांनी इच्छा होती. त्यासाठी त्याने एका कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. कॉलेजसोबतच तो पार्ट टाईम जॉबही करत होता. एक दिवशी तो सहज एका चहावाल्याशी बोलत होता. त्याचवेळी त्याला चहाची टपरी सुरू करण्याची कल्पना आली. त्याने लगेच एक पातेलं, गाळणं आणि लायटर खरेदी करुन टपरी सुरू केली. या टपरीनंतर मात्र त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
तो या चहा टपरीवर लोकांना केवळ चहाच द्यायचा नाही, तर त्यांच्यासोबत गप्पाही मारायचा. राजकारण, लोकांच्या आयुष्याबद्दल अशा अनेक विषयांवर तो गप्पा मारायचा. हळू-हळू लोकांमध्ये तो प्रसिद्ध होऊ लागला. या टपरीसाठी त्याने एमबीए सोडालं आणि फुल टाईम चहावाला बनला. प्रफुलने या सर्व गोष्टी स्वत:च्या हिंमतीवर केल्या. यासाठी त्याला कुटुंबिय, मित्र कोणाची साथ नव्हती. कुटुंबिय, मित्र त्याला चहावाला या कामासाठी अनेक गोष्टी बोलायचे मात्र त्याने हार मानली नाही.
प्रफुलच्या कल्पना लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरू लागल्या. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तो टपरीवर ओपन माईक करू लागला. यामुळे यूथ आकर्षित होऊ लागलं. वॅलेंटाईन डेला त्याने सिंगल लोकांना फ्रीमध्ये चहा दिला. ही स्टोरी अतिशय व्हायरल झाली. तो लग्नसमारंभात चहाचा स्टॉल लावू लागला. त्याने आपल्या टपरीचं नाव MBA Chaıwala असं ठेवलं.
आता प्रफुलच्या कल्पना प्रसिद्ध झाल्या असून त्याची फ्रेंचाईजी घेण्यासाठी अनेक जण तयार आहेत. त्याने अनेक कॉलेजेसमध्ये लेक्चर दिलं आहे. अनेक जण त्याच्याकडे त्याचं मत घेण्यासाठी येतात. ‘डिग्री मॅटर करत नाही, तर नॉलेज मॅटर करतं. मी चहावाला आहे आणि यावर माझं प्रेम आहे’ असं तो म्हणतो. प्रफुलने चहाचा व्यवसाय सुरू केल्यापासून 4 वर्षात त्याने 3 कोटी रुपये कमावले असून अनेकांच्या कौतुकासही तो पात्र ठरला आहे.