पुणे: पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या दहा टक्क्यांवर गेला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पुणे शहरात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन लागू करावे लागण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात नागपूर आणि अमरावती हे देखील नवे कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढं आले आहेत. नाशिकमध्येही चिंता करावी अशीच परिस्थिती आहे.
राजधानी मुंबईत देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र राज्याच्या इतर भागात त्यापेक्षा अधिक चिंताजनक परिस्थिती आहे. तिथला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारसोबतच स्थानिक नागरिकांना देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे.
राज्यात कोविड रुग्ण वाढत आहे, 500 ते 600 ने रुग्णसंख्या वाढत आहे, अशी कबुली राज्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. काही ठराविक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत, खास करून विदर्भात रुग्ण वाढताय, मुंबईत वाढताय, त्यामुळं नियम पाळावे लागतील, ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि ट्रीटमेंट करने पाळावे लागेल, केंद्राच्या कमिटीच्या सूचना आम्ही पाळतोय, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे अशा सूचना केल्या आहेत. त्याचीही अंमलबजावणी सुरू केलीये. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हे गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ‘मी सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना, खासदार, आमदारांना सांगितले आहे की रुग्ण वाढ गंभीर आहे. अनेक देशात रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन करायला लागले, आपलीही वाढ गंभीर आहे. हे सगळं काळजी वाढवणारे आहे.’
‘उद्या मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागेल, लोकांनी आता निर्णयाची मानसिकता ठेवावी, कारण कोरोना वाढ गंभीर आहे.’ असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.