अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.
अरविंद दुबे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, मुंबई
सत्ताधारी आणि प्रशासन याच्यात झालेल्या वादाच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील.
तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यात लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे, ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे तर श्रीमती अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे.
चबरोबर एस.एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव (प्र.सु. व र.व का.) या पदावर केली आहे. श्रीमती दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे तर सी. के. डांगे यांची बदली संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,पुणे येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.
तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.