माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन करुन घेतलं आहे. सौदी अरेबियामधून एका परिषदेवरुन सुरश प्रभू नुकतेच परतले. त्यातच खबरदारी म्हणून त्यांनी स्वतःला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करुन घेतलं आहे.
देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनीही काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारमधील माजी रेल्वे मंत्री आणि भाजपचे खासदार सुरेश प्रभू यांनी सेल्फ क्वॉरन्टाईन अर्थात स्वत:ला विलग केलं आहे. याआधी केंद्रीय संसदीय कार्यराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही स्वत:ला घरातच क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला होता.
भाजप खासदार, सुरेश प्रभू 10 मार्च रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. सौदी अरेबियात 10 मार्च रोजी शेरपाज बैठकीत सहभागी झाले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. अहवाल निगेटिव्ह आला. मात्र खबरदारी म्हणून सुरेश प्रभू यांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी विलग करण्याचा निर्णय घेतला. ते स्वत:च्या घरी क्वॉरन्टाईन आहेत. या काळात ते कोणालाही भेटणार नाही किंवा कोणी त्यांच्याजवळ जाणार नाही. एक वैद्यकीय पथक त्यांच्या घरात तैनात करण्यात आलं आहे.