मुंबई (प्रतिनिधी): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या विविध सेवा बंद करण्यासाठी अवघ्या काही दिवसांची मुदत राहिली आहे. पेटीएम फास्टॅगसारख्या सेवा 29 फेब्रुवारी 2024 नंतर बंद होणार आहेत. त्यातच आता पेटीएमचा फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलीय. रोड टोल ऑथॉरिटीनं (आयएचएमसीएल) पेटीएम पेमेंट्स बँक वगळता 32 बँकांची यादी जाहीर करून महामार्गावरील प्रवाशांना अधिकृत बँकांकडून फास्टॅग खरेदी करण्याचा सल्ला दिलाय.
आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील महिन्यापासून सेवा देण्यास बंदी घातलीय. त्यामुळे 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम फास्टॅग निष्क्रिय होईल. त्या अनुषंगाने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची इलेक्ट्रॉनिक टोलिंग शाखा आयएचएमसीएलनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बँकांची यादी शेअर केली आहे. या यादीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, अॅक्सिस बँक, यूको बँकेसह 32 बँकांचा समावेश आहे. त्यामध्ये मात्र या वेळी पेटीएम पेमेंट्स बँक नाही.
मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू:
प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अर्थात पीएमएलए अंतर्गत पेटीएमशी संबंधित तपास सध्या सुरू आहे. वन 97 कम्युनिकेशनने बुधवारी (14 फेब्रुवारी 2024) स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं होतं की, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून ग्राहकांबद्दल माहिती देण्यासाठी नोटिसा मिळाल्या आहेत.
ईडीने केली अधिकाऱ्यांची चौकशी:
पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर ईडीने पेटीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली व त्यांच्याकडून विविध कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी (15 फेब्रुवारी 2024) याबाबत माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट म्हणजेच फेमा अंतर्गत फिनटेक कंपनीमध्ये झालेल्या अनियमिततेची औपचारिक चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात येतेय. त्या अनुषंगाने पेटीएमच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच काही कागदपत्रं ईडीला सादर केली होती. त्यानंतर ईडीने अधिकाऱ्यांची चौकशी केली, तसेच त्यांच्याकडून इतर माहितीही मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. परंतु फेमा अंतर्गत कोणतंही उल्लंघन आढळल्यासच संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बहुतांश सेवा आता प्रभावित झाल्या आहेत. या अॅपचा वापरही कमी होऊ लागलाय. पेटीएमचं फास्टॅग वापरणाऱ्यांची संख्या करोडोंमध्ये असली तरी आता या सर्वांना दुसऱ्या बँकेचा फास्टॅग वापरावा लागेल.