अमरावती : जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या अचलपूर येथे आज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या दोन पथकांनी छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मागील दहा वर्षात अनेकदा जातीय तणाव निर्माण झाला असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या.
अचलपूर जुना शहरातील अबकारी चौकात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या मुलाला NIA दोन पथकांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. मिळालेला माहितीनुसार संबंधित शिक्षकाचा मुलगा हा नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान अनेकदा तो घरी येत होता. मागील काही दिवसांपासून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवून होती.
आज मध्यरात्रीच्या सुमारास एनआयएच्या दोन पथकांनी त्याच्या घरावर छापा मारून लॅपटॉप मोबाईल यासह अनेक वाचनाचे साहित्य व खाजगी डॉक्युमेंट ताब्यात घेतले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अति संवेदनशील शहर म्हणून अचलपूरची ओळख आहे. त्या ठिकाणी अनेकदा जातीय तणावातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. अशात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या ठिकाणी छापे मारल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.