काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्ज थकीत झाली व त्याचवेळी यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतल्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. शुक्रवार रात्री मुंबईतील ‘समुद्रमहल’ निवासस्थानावर छापे टाकण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या कपूर यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्ज थकीत झाली व त्याचवेळी यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
अधिक पुरावे गोळा करण्याच्या हेतूने ईडीने कपूर यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. दिवसेंदिवस खासगी क्षेत्रातील येस बँकेची स्थिती बिघडत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या अनियमिततेच्या विषयावरून या बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेतून महिनाभरात फक्त ५० हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना दिली गेली आहे.
राणा कपूर यांच्या वरळीतील घरावर ईडीने हा छापा टाकला. छाप्यात ईडीकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार राणा कपूर विरोधात लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राणा कपूर हे चौकशी पूर्ण होईपर्यंत आता देश सोडून जाऊ शकत नाही.
जर एखाद्या ग्राहकाकडे एकापेक्षा जास्त खाते असले तर सर्व खात्यांच्या समावेश करून तो फक्त ५० हजार रुपये काढू शकणार आहेत, अशी अट घातली आहे. हा निर्बंध ३ एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. यावेळी येस बँकचा ताबा रिझर्व्ह बँकेकडे असणार आहे. सरकारशी सल्लामसलत करून रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. वाढत्या कर्जाच्या बोजामुळे येस बॅंकेवरील कर्जाचा बोजा वाढला. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यावर निर्बंध घातले.