DRDO च्या या औषधामुळे ऑक्सिजनची पातळीच वाढलीच आणि त्यांना बाहेरून देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाणही कमी करण्यात आलं आहे.
इंदोर (मध्यप्रदेश)येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या 70 वर्षीय महिलेला संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं (DRDO) तयार केलेल्या कोरोना औषधाची लस देण्यात आली. 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज (2-DG) नावाचं हे औषध सध्या बाजारात सर्वांसाठी उपलब्ध नाही. केवळ वृद्धांसाठी चाचणी तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आलं होतं. या औषधाचा रुग्णावर चांगला परिणाम दिसून आला.
औषधामुळं या महिलेची ऑक्सिजनची पातळीच वाढलीच, तर आता त्यांना बाहेरून देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही कमी करण्यात आलं आहे. त्यांची ऑक्सिजनची पातळी 94 पर्यंत सुधारली आहे. रूग्णाची प्रकृती लक्षात घेता कुटुंबीयांनी डीआरडीकडून औषध पुरवण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर हे औषध उपलब्ध झालं असल्याची माहिती देण्यात आली.
महिलेचा मुलगा पियूष गोयल यांनी सांगितलं की, त्याची आई संतोष गोयल यांना यापूर्वी कोरोनाचा त्रास झाला होता. काही दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात दिली. तब्येत बरी झाल्यावर त्यांना घरी आणले गेले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना पोस्ट कोविडचा परिणाम अचानक दिसू लागला. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि सुमारे दीड महिन्यांपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितलं की, आईला शुगर, बीपीचा त्रास होतो. यापूर्वी तिला कर्करोग देखील झाला होता. पण सध्या कोरोनामुळं आईची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले तरी फरक पडत नसल्यानं अखेर याबाबत आम्ही डीआरडीओला माहिती दिली आणि तेथून या औषधाची चाचणीसाठी म्हणून मागणी केली गेली. त्यानंतर आम्हाला औषधाचे 4 डोस मिळाले. रविवारी संध्याकाळी आईला पहिला डोस देण्यात आला. सोमवारी दुसरा डोस देण्यात आला. पीयूष गोयल म्हणतात की, आईची इच्छाशक्ती खूप चांगली आहे. यामुळंच ती कोविड आणि पोस्ट कोविडशी चांगला लढा देत आहे.
याबाबत एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये या वृद्ध महिलेवर उपचार करणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रुग्णाला जवळपास एक तासापूर्वी डीआरडीओचं औषध दिलं गेलं. औषध देण्यापूर्वी रुग्णाला 14 लिटर ऑक्सिजन देण्यात येत होतं. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन लेवल 92 होती. एक तासानंतर औषधाचा प्रभाव दिसणं सुरू झालं. एक तास आणि 10 मिनिटांनंतर ऑक्सिजन पातळी वाढून 94 टक्के झाला. त्याच वेळी ऑक्सिजनही प्रति मिनिट 10 लिटरपर्यंत कमी झाल्याचे दिसून आलं.