पुणे: पुण्यात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे कुख्यात गुंड शरद मोहळ. शरद मोहळ याचा ५ जानेवारीला भरदिवसा भरलेल्या वस्तीत गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे. शरद मोहोळच्या हत्येतील मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा आणि मोहोळच्या सोबत राहणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकरसह ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नुकताच शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या घटनेत पुणे सत्र न्यायालयातीले दोन नामांकित वकिलांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी या दोघांची नावं आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करतात. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली.
आतापर्यंत पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरसोबत मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा सोबत सहा आरोपींना पळून जात असताना अटक केली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यावरुन शरद मोहोळ याचा प्लॅनिंग करून गेम केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास पोलिस करत आहे.