सुरज गायकवाड, मुंबई
मुंबईत ७० करोनाबाधित रुग्ण बेपत्त असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या बेपत्ता रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मुंबई पोलिसांची मदत मागितली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही मालाड येथील शताब्दी रुग्णालयातून वृद्ध करोना रुग्ण पळून गेल्यानं एकच खळबळ माजली होती. त्यामुळं प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबईत करोना रुग्णांचा वाढता आकडा कमी करण्यासाठी पालिका नवीन उपाययोजना आखत असतानाच करोना रुग्णांना शोधण्याचं पालिकेसमोर आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईतील मालाड परिसरातून ७० रुग्ण बेपत्ता झाले आहेत. हा परिसर नुकताच करोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या रुग्णांचा कॉल रेकॉर्डिंग डेटा तपासला असून त्यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे करोना रुग्ण ३ महिन्यांपासून गायब आहेत. त्यांच्या फोन नंबरही बंद आहे. ते सध्या कुठं आहेत याची त्यांच्या घरच्यांनाही माहिती नसल्याचं समोर येतंय. करोना चाचणी केल्यानंतरचं ते बेपत्ता झाल्याचं निदर्शनास आलं आहे. काही जणांच्या घरांना टाळे आहे तर काहींनी घराचा पत्ता चुकीचा सांगितला आहे. अशी माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या रुग्णांचा शोध घेण्यास सांगितलं आहे. या रुग्णांतील काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ‘मुंबई पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचा फोन बंद असल्यानं त्यांच्यासोबत संपर्क करता येत नाहीये. पण आम्ही त्यांची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं कळताच या लोकांनी घर सोडलं आहे. यांनी त्यांच्यासोबतच दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घातला आहे,’ असं इक्बाल चहल यांनी सांगितले