बुधवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये खासगी वाहनांना ई-पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.
अरविंद दुबे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, मुंबई
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाउन आहे. पण, देशाची आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे केंद्र सरकारने काही अटी शिथिल केल्या आहे. त्यामुळे राज्याअंतर्गत वाहतूक आता मोकळी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिना आता संपत आला आहे, त्यामुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात लॉकडाउनचे बरेच निर्णय मागे घेतले जाण्याची चिन्ह आहे.
येत्या बुधवारी मुंबई महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये लॉकडाउनमधून लोकांची सुटका करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
राज्यात मार्च महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत वाहतूक ही पूर्णपणे बंद होती. वाहतूक बंद असल्यामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे केंद्राने राज्यातील अंतर्गत वाहतुकीवर असलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 20 ऑगस्टपासून एसटी बससेवा सुरू झाली आहे. लालपरी तब्बल 5 महिन्यानंतर पुन्हा एकदा धावायला लागली आहे. परंतु, खासगी वाहनांना ई-पास अजूनही कायम आहे.
दरम्यान, ‘केंद्राने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्याबाबतचं पत्र आलेलं असलं तरी प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती ही वेगळी असते. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच घेतला जाणार आहे’ असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बुधवारी होणाऱ्या या बैठकीमध्ये खासगी वाहनांना ई-पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल वाहतूक सुरू आहे. लोकल सेवा सुरू झाली तर मुंबई पूर्वपदावर येईल, असा सूर आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू करायची तर नेमके काय करावे लागले, याचीही चर्चा केली जाणार आहे. लोकल सेवा सुरू झाली तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती सरकारला आहे. त्यामुळे अद्याप लोकल सेवा ही अत्यावश्यक म्हणून चालवली जात आहे. म्हणून, बुधवारी होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत लॉकडाउन संपुष्टात आणण्यावर चर्चा होईल. पण, याची अंमलबजावणी ही गणेश विसर्जनानंतर होण्याची शक्यता आहे.
राज्यात वाहतूक सेवा, मॉल, हॉटेल्स सुरू झाले आहे. पण, अजूनही धार्मिक स्थळे बंद आहे. त्यामुळे एकीकडे सार्वजनिक ठिकाणं खुली केली जात आहे पण काही ठिकाणी नियम आणि अटी कायम आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे लोकांना आता जास्त दिवस लॉकडाउनमध्ये न ठेवता लॉकडाउन संपुष्टात आणण्याकडे सरकारचा कल आहे.