राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच 21 तारखेला होणार

मुंबई (प्रतिनिधी): राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिलं असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिवाळीपूर्वीच 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालयं आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे. यंदा दिवाळी ही 22 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम:
राज्य शासनातील सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.  यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12 हजार 500 एवढी रक्कम दिली जाणार असून 10 समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.  यापूर्वी 2018 साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता.  अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 5 लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो.  परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News