मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याच्या मुळाशी कोण आहे याचा तपास केला जाईल.”

आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. या अनुषंगाने पोलिस आता तपास करत आहेत.

गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवर होणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील असंही समजतंय.