creditcard

पालघर: ट्रक अडवून चालकाला बेदम मारहाण; दरोडेखोरांचा कोट्यवधीच्या सिगारेटवर डल्ला

axis

चोरी किंवा दरोड्याच्या अनेक घटना आपण दररोज ऐकत किंवा वाचत असतो. मात्र, अनेकदा ही चोरी इतकी अजब प्रकारे केली जाते की ती चर्चेचा विषय ठरते. बऱ्याचदा चोर अशा गोष्टींवर डल्ला मारतात, ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो. सध्या पालघरमधून अशीच एका अजब चोरीची घटना समोर आली आहे.

No posts found.

या घटनेत सशस्त्र दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकमधून 1.36 कोटी रुपयांची सिगारेट लुटली. मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितलं की, सहा अज्ञात दरोडेखोरांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केलं. यानंतर ट्रक दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यातील सिगारेट काढून घेतल्या. हा ट्रक नवी मुंबईतील रबाळे येथून जयपूरच्या दिशेने जात होता.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कारमधील दरोडेखोरांनी सकवार गावाजवळ ट्रक थांबवला. त्यांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर त्यांनी ट्रक दुसऱ्या ठिकाणी नेला. ट्रकमध्ये भरलेली 1.3 कोटी रुपयांची सिगारेटची खेप रिकामी केल्यानंतर ट्रक तिथेच सोडून त्यांनी पळ काढला.

दरोडेखोरांनी ट्रक चालकालाही चारोटी टोलनाक्याजवळ सोडलं आणि पळ काढला. या प्रकरणी वसई-विरारच्या मांडवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेत एकूण 6 अज्ञात दरोडेखोरांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.