महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका ? अंधेरीच्या निकालानंतर ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली

मुंबई (प्रतिनिधी): अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला. या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?:
‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ मोठ्या घोषणा करत असतं. कालपर्यंत गुजरातच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रातील जमीनवर काही प्रकल्प ठरले होते, पण हे प्रकल्प महाराष्ट्रातून ओरबाडून नेण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांना महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलंय. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्राकडे दिले आहेत. या घोषणांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात’, असा अंदाज उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या अंदाजावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. ‘काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 3 महिन्यांमध्ये इतकं काम हे सरकार करत आहे, तर अडीच वर्षात काय करेल, ही भीती लोकांना आहे. मध्यावधी निवडणुकांच्या खोट्या बातम्या पेरत आहेत,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते पालघरमधल्या कार्यक्रमात बोलत होते.

‘170 आमदारांचं हे मजबूत सरकार आहे. आघाडी तुटतेय, आमदार कुठेही जाऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका लागल्या तर आमचे 200 आमदार आल्याशिवाय राहणार नाहीत. मागच्या सरकारात पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांची एकही सभा झाली नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी सत्तेला लाथ मारून माझ्यासोबत आले,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Loading