भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यू सरकारी आकडेवारीपेक्षा 8 पट जास्त? ‘द लॅन्सेट’च्या अहवालात दावा

भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यू सरकारी आकडेवारीपेक्षा 8 पट जास्त? ‘द लॅन्सेट’च्या अहवालात दावा

गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे; पण गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गानं कहर केला होता. कोरोनामुळे जगभरातल्या लाखो नागरिकांचा बळी गेला. आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. भारतातल्या आणि जगभरातल्या कोरोना बळींबाबतची (Corona Death) माहिती देणारा एक रिपोर्ट द लॅन्सेट या (The Lancet) मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. कोरोना बळींची संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याबद्दलचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे.

आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 4,89,000 जणांचा मृत्यू झाला, असं भारत सरकारची अधिकृत आकडेवारी सांगते; पण प्रत्यक्षात या आकडेवारीपेक्षा आठ पट अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा ‘द लॅन्सेट’मध्ये करण्यात आला आहे. हा दावा खरा मानला तर भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 40 लाखांपेक्षा जास्त बळी गेले आहेत असं म्हणता येईल.

भारतात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी नोंदवण्यात आल्याचा दावा द लॅन्सेटच्या एका नव्या रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे. हा रिसर्च पेपर 11 मार्च 2022 रोजी प्रकाशित झाला आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत कोविड-19मुळे संपूर्ण जगभरात 59 लाख जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. प्रत्यक्षात 1.82 कोटी जणांचे बळी गेल्याची शक्यता लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच ही संख्या अधिकृत नोंदीपेक्षा तीन पट अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 या काळात कोविड-19 मुळे जगभरात 59 लाख जणांचा मृत्यू झाला अशी अधिकृत नोंद आहे; पण कोरोना महामारीमुळे जगभरात जवळपास 1.82 कोटी बळी गेल्याचा आमचा अंदाज आहे,’ असं द लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. देशनिहाय विचार केला, तर भारतात 40.7 लाख, अमेरिकेत (US) 11.3 लाख आणि रशियात (Russia) 10.7 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं द लॅन्सेटचं म्हणणं आहे. म्हणजेच प्रत्येक देशानं कोरोना बळींची खरी आकडेवारी लपवली असल्याचं द लॅन्सेटचं म्हणणं आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News