पुन्हा ‘मौका मौका’, T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तान लढत !
भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत. आयसीसीने यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुपची घोषणा केली आहे. यातल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षाची स्पर्धा भारतात होणार होती, पण कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे वर्ल्ड कप युएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे.
आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुपची घोषणा केली असली, तरी वेळापत्रक मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. पण 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपला सुरू व्हायच्या आधी काही टीमना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये ग्रुप-ए आणि ग्रुप-बी अशी विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप-एमध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी दोन-दोन टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील.
ग्रुप -1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्यासह ग्रुप-एचा विजेता आणि ग्रुप-बीचा उपविजेता संघ असेल.
ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप एचा उपविजेता आणि ग्रुप बीचा विजेता असेल.
कोरोनामुळे स्पर्धेचं आयोजन युएई ओमानमध्ये होणार असलं तरी स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ही बीसीसीआयची (BCCI) असणार आहे. याआधी 2016 साली भारतात टी-20 वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा वेस्ट इंडिजने ही स्पर्धा जिंकली होती.
टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अर्ध्यातच 29 मॅचनंतर स्थगित करण्यात आली होती. आता उरलेले 31 सामने युएईमध्ये होतील.