पुन्हा कोरोनाचा कहर! राज्यात एका दिवसात आढळले ७८८ रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आज (रविवार) राज्यात ७८८ नवीन रुग्ण आढळले. एका जणाचा मृत्यू झाला आहे. राज्यात ४५८७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर आज ५६० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१२ टक्के आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनाची प्रकरणे पाहता राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी २४ डिसेंबरपासून मुंबई, नागपूर आणि पुणे विमानतळांवर हे स्क्रिनिंग केले जात आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या  ४५८७ झाली आहे.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात ५,३५७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सक्रिय प्रकरणे ३२,८१४ वर पोहोचली.

११ मृत्यूंसह मृतांची संख्या ५,३०,९६५ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये तीन, हिमाचल प्रदेशमधील दोन आणि बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

Loading