देशात धावली हायड्रोजनवर चालणारी पहिली कार, गडकरींनी केला प्रवास
नवी दिल्ली: आज देशात पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार धावली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमधून संसदेत दाखल झाले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमध्ये ग्रीन हायड्रोजन सर्वात मोठा पर्याय असून याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल, असं नितीन गडकरी म्हणाले.
जगभरात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाची गरज आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी ग्रीन हायड्रोजन इंधनाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आज त्यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून घरापासून तर संसदेतपर्यंत प्रवास केला. बाजारात तेल, गॅसच्या किंमती वाढत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन चांगला पर्याय आहे. ग्रीन हायड्रोजन म्हणजे पाण्यापासून निघणारं हायड्रोजन. त्यावर गाडी चालतेय. याचा खर्च प्रति किलोमीटर २ रुपये येईल. मथुरामध्ये देखील सांडपाण्यावर आम्ही प्रयोग केले आहेत. देशातील महापालिकेत असणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर उपाय शोधून आम्ही स्वच्छ इंधन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं नितीन गडकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
देशातील पहिल्या हायड्रोजन कारने नितीन गडकरींनी प्रवास केला आहे. ही कार इंधन भरल्यानंतर जवळपास ६०० किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे प्रदूषण देखील होत नाही. त्यामुळे हा स्वच्छ ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो.