मुंबई (प्रतिनिधी) : लॉक डाऊन मुळे संपूर्ण राज्यभरात उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. परंतु मिशन बिगीन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात जवळजवळ सारेच व्यवसाय सुरु झाले आहेत. मात्र हॉटेल्स व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. हॉटेल्सना फक्त पार्सल सुविधा देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्स व्यवसाय सुरु करायचा की नाही, यावर मुख्यमंत्र्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु होती. आणि अखेर यावर आज (दि.०६) निर्णय झाल्याची माहिती मिळतेय.
येत्या ८ जुलै पासून राज्यातील हॉटेल्स सुरु करता येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलीये. परंतु हा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी नियामावली काढण्यात आली आहे. या नियमांचे पालन केले तरच हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरु करता येणार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
असे आहेत नियम…
शहरांसाठी आणि महापालिका असलेल्या ठिकाणी आखलेल्या कन्टेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेल्स सुरु करण्यासाठी परवानगी आहे.
हॉटेल्स, गेस्ट हाउस, लॉज हे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी आहे.
जर हॉटेल्स किवा गेस्ट हाउस क्वारंटाईन सेंटर केले असेल तर ती पुढे सुरु करता येणार की नाही हा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल.
३३ टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरून उरलेली ६७ टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरता येणार असल्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाकडे आहेत.
हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक आहे.