ऑगस्टमध्ये भारतात सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ब्राझील, अमेरिकेलाही टाकलं मागे

ऑगस्टच्या पहिल्या 8 दिवसातील भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.

मुंबई (प्रतिनिधी): सध्या जगात सर्वाधिक जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र ऑगस्टमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार आता भारताची चिंता वाढली आहे. भारतातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा दर वाढतो आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या 8 दिवसात जगातील सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद भारतात झाली आहे.

भारतात 8 दिवसात एकूण 4.55 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. म्हणजं दररोज सरासरी जवळपास 54 हजार कोरोना रुग्ण सापडले. 31 जुलैला कोरोनाचे एकूण 16.97 लाख रुग्ण होते, 8 ऑगस्टपर्यंत ही संख्या 21.52 लाख झाली. एक ऑगस्टला देशात जवळपास 54 हजार नवीन कोरोना प्रकरणं होती. 8 ऑगस्टला ती 65 हजार पार झाली आणि हा वेग खूपच भयंकर आहे. जगातील कोरोनाव्हायरसच्या 50% पेक्षा जास्त प्रकरणं फक्त भारत, ब्राझील आणि अमेरिका या तीन देशांमध्येच आहेत. या तुन्ही देशांतील ऑगस्टच्या 8 दिवसांतील नवीन प्रकरणं पाहिली तर भारतात 4.55 लाख, ब्राझीलमध्ये 3.47 लाख आणि अमेरिकेत 4.42 लाख प्रकरणं आहे.

जगाची आकडेवारी पाहता ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. एक ऑगस्टला 1.77 कोटी रुग्ण होते. 8 ऑगस्टला ही संख्या 1.97 कोटी झाली आहे. म्हणजे जवळपास 2 कोटीपर्यंत पोहोचली. जगातील एकूण प्रकरणांपैकी 11% प्रकरणं भारतात आहेत. मात्र ऑगस्टमधील नव्या प्रकरणांचा विचार केला तर भारतात सर्वात जास्त म्हणजे 25 टक्क्यांपेक्षाही जास्त प्रकरणं आहेत. याचा अर्थ एकूण सर्वाधिक प्रकरणांमध्ये अद्याप तरी भारत तिसऱ्या प्रकरणांवर असला तरी नव्या प्रकरणांबाबतीत भारत ऑगस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

हा वेग असाच कायम राहिला तर भारत कदाचित ब्राझीलला मागे टाकून जगातील दुसरा सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश बनण्याची शक्यता आहे. भारत आणि ब्राझीलची तुलना करता 31 जुलैला ब्राझीलमध्ये 26.66 लाख आणि भारतात 16.97 लाख प्रकरणं होती. या दोन्ही देशांमध्ये 9.70 लाख प्रकरणांचा फरक होता आणि 8 ऑगस्टला हा फरक फक्त 8.61 लाख प्रकरणं इतकाच राहिला आहे. म्हणजे एका आठवड्यात एक लाख प्रकरणांचं अंतर कमी झालं आहे. जर दोन्ही देशांमधील वेग असाच राहिला तर 8 आठवड्यात भारत ब्राझीललाही मागे टाकेल आणि भारतातील रुग्णवाढीचा वेग वाढला तर मग 8 आठवड्यांच्याआधीच भारत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.

Loading