सिनेमा: अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेचे केले तोंडभरून कौतुक; म्हणाला, श्रेयसजी तुमचा आवाज..

टॉलिवूडचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी फार पसंती दिली. तेलुगूसोबत हिंदीतही हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करत आहे.

चित्रपटातील अल्लू अर्जूनचा स्टाईल, त्याचा डान्स आणि चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

तर ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जूनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.

यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना अल्लू अर्जूनने श्रेयसचे आभार मानले आहेत. तर हा व्हिडिओ शेअर करत श्रेयसनेही अल्लू अर्जूनचे आभार मानले आहेत.

श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अल्लू अर्जून मुलाखत देताना दिसून येत आहे. यावेळी मुलाखतकर्ता अल्लू अर्जूनला सांगत आहे की, ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये श्रेयस तळपदेने अल्लू अर्जूनला आवाज दिला आहे.

तेव्हा अल्लू अर्जून म्हणतो की, ‘हो मला माहित आहे आणि श्रेयसजी यासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार’.

श्रेयसने अल्लू अर्जूनचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘तुझ्या या शब्दांबद्दल खूप खूप धन्यवाद अल्लू अर्जून. तसेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी माझा आवाज योग्य आहे असा विचार केल्याबद्दल मनीष शाह तुमचे व माझ्या आवाजातील सुधारणेसाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंड डायरेक्टर अब्दुल तुमचेही मनापासून धन्यवाद.

याशिवाय श्रेयसने सर्व प्रेक्षकांचेही आभार मानत लिहिले की, ‘पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे हे प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. यासोबतच श्रेयसने खूप अभिमान वाटत असल्याचेही पोस्टद्वारे सांगितले आहे. श्रेयसच्या या पोस्टवर अनेक चाहते लाईकचा वर्षाव करत कमेंटद्वारे त्याला शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, श्रेयसने यापूर्वी मकरसंक्रातीच्या दिवशी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्याने सांगितले की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याच्याकडे काही काम नव्हते. तेव्हा श्रेयसच्या एका मित्राने त्याला डबिंगसाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते.

त्यानुसार श्रेयस एका डबिंग ऑडिशनसाठी पोहोचला. मात्र, तिथे त्याला रिजेक्ट करण्यात आले होते. पण आता त्याच्याच आवाजातील ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे तो भारावून गेला आहे. तसेच त्याच्या आवाजाचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत असल्याने श्रेयसने व्हिडिओद्वारे सर्वांचे आभार मानले.

दरम्यान, ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. तेलुगूसह हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होत आला तरी अद्याप बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News