मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली मेसेंजर सेवा Whatsappची सेवा ठप्प पडली आहे. अनेक ठिकाणी युजर्सना अडचण जाणवत आहे. मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र, सेवा पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास Whatsappवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला आहे. Whatsappची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, 69 टक्के युजर्सना मेसेज करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले. तर, 21 टक्के युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती. तर, 9 टक्के युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला, व्हॉट्स अॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या. त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.
अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी Whatsappचा वापर करतात. व्हॉट्स अॅप हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला आहे. Whatsapp डाऊन झाल्याने कोट्यवधी युजर्सचा त्याचा फटका बसला आहे.