भारतीय शेअर मार्केटमधून (Stock Market) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये आज नवीन विक्रम (Stock Market Record) झाला आहे. सेन्सेक्सने (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) विक्रमी पातळी गाठली आहे. आज सेन्सेक्सने 83,359.17 ची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टी प्रथमच 25,500 च्या वर गेला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्के कपात केली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.
यूएस फेडच्या निर्णयाचा तात्काळ परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर गेला आहे. बँक निफ्टीही शेअर बाजारात नवीन शिखर गाठण्याच्या जवळ आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे आणि एचडीएफसी बँकेने 1711 रुपयांच्या वर व्यापार दर्शविला आहे.
बाजाराची दमदार सुरुवात:
आज, BSE सेन्सेक्स 410.95 अंकाच्या वाढीसह 83,359.17 वर सुरू झाला आणि NSE निफ्टी 109.50 अंक किंवा 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 25,487.05 वर सुरू झाला. बँक निफ्टी त्याच्या सार्वकालिक उच्चांकाने फक्त 4 अंकांनी मागे होता पण त्याचे शेअर्स मार्केटला मोठा उत्साह देत आहेत. काल आयटी शेअर्समध्ये घसरण झाली होती पण आज यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे आयटी शेअर्स प्रचंड वाढले आहेत.
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती:
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 29 समभागांमध्ये वाढ होत असून केवळ एक समभाग घसरत आहे. बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाल्याने गुंतवणूकदार उत्साहित आहेत. फक्त बजाज फिनसर्व्हचे शेअर्स घसरत आहेत.
अमेरिकेत घेतलेल्या निर्णयाचा शेअर मार्केटवर परिणाम:
अमेरिका हा जगातली एक बलाढ्य महासत्ता असणारा देश आहे. या देशाने राबवलेल्या निर्णयाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर पडतो. असे असताना आता अमेरिकेने व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँफ फेडरवल रिझर्व्हने तब्बल चार वर्षांनंतर व्याजदरात कपात करण्याचे जाहीर केले आहे. फेडवरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (18 ऑक्टोबर) फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला. दरम्यान, अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचा भारतीय शेअर मार्केटवर आज परिणाम दिसून आला आहे. शेअर मार्केटमध्ये आज मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सने आणि निफ्टीने आज विक्रमी पातळी गाठली होती.