पुणे : आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे. तसेच, मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हजेरी लावली आहे..!
कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल मारली असून संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यही व्यापले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून मिळाली आहे.
नेहमीप्रमाणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता आणि मान्सूनची पुढची वाटचाल ही व्यवस्थित होती. मात्र दरम्यानच्या काळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची स्थिती भरकटली होती. पण आता परत मान्सून मूळ स्थितीवर आला असून मान्सूनने आज राज्यातील विविध जिल्हे व्यापले आहेत.