ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीला ब्रेक, ST कर्मचारी पुन्हा संपावर, कुठे ST सुरु कुठे बंद?

महाराष्ट्रातील लालपरी म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१मध्ये मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी जवळपास दोन महिने दिवस बसची चाके थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने ऐन गणेशोत्सव काळात एस्टी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सर्वच एसटी कर्मचारी चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने एसटी सेवा ठप्प झाली आहे.

कल्याण विठ्ठलवाडी आगारातून कोकणाकडे गुहागर, चिपळूण, रत्नागिरी यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी धावतात. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार अनेक अतिरिक्त एसटी सोडण्यात आले आहेत. तर राजकीय पक्षांनी देखील अनेक भागात जाणाऱ्या एसटीचे आगाऊ बुकिंग केले आहे. मात्र गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उभारल्याने एसटी प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

कर्मचारी संघटनेच्या वतीने शासकीय नियमानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ७ ऑगस्ट रोजी याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० ऑगस्टपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटून गेली तरीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हे संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. कल्याण आणि विठ्ठलवाडी आगारातील १००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी डेपोत ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे. याचे परिणाम म्हणून आगारात सर्व असतील आणि एसटीतून प्रवास करणारे प्रवासी खोळंबले आहेत.

सोमवारी पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या दोन ते तीन एसटी आगारातून मार्गस्थ झाल्यानंतर मोर्चेकरी कामगारांनी डेपोचा ताबा घेत आंदोलनाचा एल्गार केला यानंतर सगळ्या कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने एसटी सेवा रखडली आहे. दरम्यान, राज्य शासनाशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कल्याण एसटी व्यवस्थापकांनी सांगितले.

कोणकोणत्या आगारात बससेवा ठप्प:
३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत.

मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत.

विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.