मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टाचे हे आदेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का देणारे आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याच्या अधिकार नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे.