मुंबई : महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पण मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर सुरुवातीला शरद पवार यांनी या बंदमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. पण मविआतल्या काँग्रेस अन् शिवसेनेनं आपली भूमिका मांडली नव्हती. पण आता शिवसेनेनं देखील हा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे म्हणाले, “उद्याच्या बंदचं कारण वेगळं होतं. हायकोर्टानं या बंदबाबत दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही याविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो मात्र तेवढा वेळ नाही. त्यामुळं आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. पण महाराष्ट्रातील सर्व शहरातील मुख्य चौकांमध्ये तोंडाला आणि हाताला काळ्या फिती लावून आम्ही आंदोलन करु”.
“या देशात आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक आहे का? लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या की नाही? यावर घटनातज्ज्ञांनी प्रकाश टाकायला हवा. काल मी आवाहन केलं होतं की, जनतेनं या बंदमध्ये उस्त्फुर्तपणे सहभागी व्हावं. बंदमध्ये तोडफोड करा, जाळपोळ करा असं सांगितलं नव्हतं. पण आता हायकोर्टानं आम्हाला उद्याचा बंद करु नये असं सांगितलं, पण बंद करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं”
“सर्वांना आपल्या बहिणीची, आईची काळजी घेतली पाहिजे, त्यांचं संरक्षण करण्यााच अधिकार त्यांना आहे. त्यामुळं उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही शिवसेना भवन इथं तोंडाला आणि हाताला काळ्या फीती लावून बसणार आहोत. सध्या राज्यात ज्या काही घटना घडत आहेत त्याची जबाबदार कोण घेणार आहे. महिलांवर अत्याचार करणारे जे नराधम आहेत त्यांच्यावर वचक बसावा म्हणून हा बंद आम्ही करणार होतो, असंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.”