गेल्या आठवड्यात दिल्लीसह उत्तर भारतात कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर, देशात तापमानाचा पारा घटला आहे.
वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरूही झाला नाही, तोपर्यंत ब्लूमबर्गच्या हवामान रिपोर्टने नागरिकांची चिंता वाढवली आहे.
यंदाचा हिवाळा हा हाडं गोठवणारा ठरणार असल्याची माहिती ब्लूमबर्गकडून देण्यात आली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा थंडीचा सर्वाधिक कहर असेल, असा अंदाजही संबंधित रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
खरंतर, प्रशांत महासागराच्या परिसरात सध्या ‘ला नीना’ हा घटक पुन्हा डोकं वर काढत आहे. याचा फटका उत्तर पूर्व आशियातील बहुतांशी देशांना बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्क्टिक समुद्रात बर्फाचे प्रमाण घटल्यामुळे वायव्य आशियात कडाक्याची थंडी पडू शकते. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती उद्भवली होती. त्यामुळे यंदाही जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान देशात हाडं गोठावणारी थंडी पडू शकते, असा अंदाज ब्लूमबर्गकडून वर्तवण्यात आला आहे.
संबंधित हवामान अंदाज जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी वर्तवण्यात आला आहे. दरम्यान संबंधित दोन महिन्यात दिल्लीसह देशातील किमान तापमानाचा पारा 3 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी असू शकतो. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ची स्थिती निर्माण होणं, म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील तापमानात एका झटक्यात होणारी मोठी घसरण मानली जाते. यंदा ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रात सध्या पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पहाटे वातावरणात गारवा वाढला असून धुके देखील वाढलं आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास वाहन चालवणाऱ्या चालकांना याचा त्रास जाणवू लागला आहे. पुणेकरांना मात्र आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोमवारी पुण्यात 31.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 16.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत शहरात ढगाळ हवामान राहणार असून काही प्रमाणत तापमान वाढण्याची शक्यता आहे.