मुंबई : राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा आकडा आता 169 वर पोहोचला आहे. त्यात कल्याण (पूर्व) आणि डोंबिवलीत प्रत्येकी एक असे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. डोंबिवलीमध्ये आढळलेला रुग्ण एका लग्न सोहळ्यात गेला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या 8 झाली आहे. नवीन रूग्ण हे चिंचपाडा, कल्याण पूर्व व राजाजी पथ, डोंविबली पूर्व येथील आहेत. सदर दोन्ही रूग्णांच्या परिसरात महापालिकेच्या तिसगाव व मढवी नागरी आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हेक्षण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कंटेन्टमेंट प्लॅन तयार करण्यात येऊन सदर कार्यवाही पुढील 14 दिवस घरोघरी जाऊन राबविण्यात येणार आहे.
एक आर्यलंडवरून परतला तर…
कल्याण येथील रूग्ण आर्यलंडवरून परतला असल्याबाबत माहिती मिळाली आहे. तर डोंबिवली येथील रूग्ण 19 मार्च हळदी समारंभ तसेच रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील आयोजित लग्न सोहळयास उपस्थित असल्याचे समजते. सदर दोन्ही रूग्ण सद्यःस्थितीत मुंबई येथील कस्तुरबा रूग्णालयात दाखल आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
दुसरीकडे, जुनी डोंबिवली ग्राऊंड येथील लग्न सोहळयास तसेच हळदी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी त्वरीत स्वतःला 14 दिवस होम क्वॉरंटाईन करावेत. तसेच आजारसदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत महापालिका रुग्णालयात येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 169 वर पोहोचली आहे. त्यात मुंबईत 7 नव्या रुग्णांची भर पडली. तर नागपूरमध्ये 1 जण आढळला आहे. शनिवारी 10 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 6 महिला आणि 3 पुरुष दाखल आहेत.