ज्योती मल्होत्राच्या चॅटचा तपास; ISI अधिकाऱ्यासोबतच्या संवादातून उघड झाली कटाची माहिती

मुंबई, दि. २० मे २०२५: हेरगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या व्हॉट्सॲप संवादात मल्होत्रा आणि आयएसआयचा एक अधिकारी अली हसन यांच्यात झालेल्या संभाषणातून संशयास्पद हालचालींचा खुलासा झाला आहे. या संवादात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांची चर्चा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

तपासात उघड झाल्यानुसार, ज्योती मल्होत्राने वाघा-आटारी सीमेच्या मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. तिथे असताना, तिचा संपर्क अली हसन या आयएसआय ऑपरेटरसोबत व्हॉट्सॲपवर झाला. चॅटमध्ये हसनने सुरुवातीला अप्रत्यक्षपणे, कोडवर्ड वापरत, भारतातून कोणती व्यक्ती पाकिस्तानमध्ये आली आहे का याची चौकशी केली होती. त्यात विशिष्ट व्यक्तींना “प्रोटोकॉल” मिळालाय का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर मल्होत्राने ‘मला प्रोटोकॉल मिळालेला नाही’, असे उत्तर दिले. पुढे हसनने अधिक स्पष्टपणे, भारतातून कोणतेही अंडरकव्हर एजंट किंवा गुप्तहेर पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत का, यासंदर्भातील माहिती विचारली होती. त्याने कोणाला गुरुद्वारामध्ये घेऊन येण्याची सूचनाही दिली होती, जे कोडवर्ड स्वरूपातील आदेश असल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे.

या संवादाच्या आधारे, अली हसन भारतीय गुप्तहेरांच्या हालचालींबाबत माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्ट होतं. विशेष म्हणजे, या संदर्भातील माहिती भारत सरकारने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’साठी महत्त्वाची ठरली होती. या मोहिमेच्या यशामध्ये गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितींनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे, अशा माहिती मिळवण्यासाठी हसनने मल्होत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.

सध्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरु असून, तिच्या कनेक्शनमुळे भारतातील राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Loading