…आता Jio Down; ‘रिलायन्स जिओ’ला नेटवर्क नाही, लाखो यूजर्स हैराण
दोन दिवसांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्लोडाऊन झाल्यानंतर जगभरातील कोट्यवधी यूजर्सना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.
त्यानंतर आता तीच समस्या रिलायन्स जिओला येत असून आज सकाळपासूनच नेटवर्क नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
जिओच्या यूजर्सना कॉल वा मेसेज करता येत नसल्याने ते चांगलेच हैराण झाल्याचं दिसून येतंय. याच्या प्रतिक्रिया ट्विटरवर दिसत असून #JioDown हा ट्रेन्ड सुरु झाला आहे.
देशात रिलायन्स जिओचे सुमारे 40 कोटी ग्राहक आहेत. यामध्ये कुणाला नेटवर्कच येत नाही, कुणाचा कॉल लागत नाही तर कुणाचे मेसेज पोहोचत नाहीत अशा अनेक तक्रारी सुरु झाल्या आहेत. याचसोबत यूजर्सना इंटरनेटचा वापर करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. जिओच्या या स्लोडाऊनवर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. जिओ स्लोडाऊनचे कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
#JioDown ट्रेन्ड सुरु:
जसं जिओ नेटवर्क स्लोडाऊन झालं तसं सोशल मीडियावर #JioDown हा ट्रेन्ड सुरु झाला आहे. लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच यावर अनेक भन्नाट आणि गमतीशीर मीम्स तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी जगभरात अचानक व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम काम करेनासे झाले होते. सोमवारी रात्री 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. यूजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.