मुंबई (प्रतिनिधी): मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आला आहे.
नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पालिका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सखल भागात पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री स्वत: ग्राऊंडवर उतरण्याची शक्यता आहे. ते आज कंट्रोल रुमला भेट देऊ शकतात.
सायन परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे. सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी झालं आहे. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये देखील पाणी साचलं आहे. हिंदू कॉलनीला तलावाचा स्वरूप आलं आहे. मुंबई उपनगरात देखील पाण्याचा जोर वाढला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. रस्त्यावर गुडघ्याच्या वरती पाणी साचले असल्याने लोकांना वाट काढत चालावं लागत आहे.
समूद्रामध्ये मोठ्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. चार ते साडेचार मीटरपर्यंच उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहीला तर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. रस्त्यांवर पूर्ण पाणी साचलं आहे. मुंबईकरांना वाहनं चालवणे देखील कठीण झाले आहे. पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील पाहायला मिळू शकतो.
सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी.
बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.