Breaking News: अखेर संजय राऊत यांना जामिन मंजूर !

मुंबई (प्रतिनिधी): पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.  संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.

आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती. सर्वाचंं लक्ष हे  न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या निकालाकडे लागलं होतं. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.   ईडीकडून अटर्नी जनरल अनिल सिंह यांनी जोरदार युक्तिवाद करून राऊत यांचा जामीन अंमलबजावणी कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली.  अपील करण्यासाठी कालावधी मागितला. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा दाखला दिला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ईडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडी या प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये जाणार आहे.

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला होता. अखेर या प्रकरणात अनेक महिन्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News