मी पुन्हा येतोय! फडणवीस-शिंदे राजभवनावर, आजच होणार शपथविधी!
मुंबई (प्रतिनिधी): बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, यानंतर राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत.
या भेटीमध्ये दोन्ही नेते राज्यपालांना त्यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या सहीचं पत्र देतील.
सत्तास्थापनेचं पत्र दिल्यानंतर राज्यपाल फडणवीस आणि शिंदे यांना शपथविधीसाठी बोलावतील.
हा शपथविधी आजच संध्याकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सोहळा होईल. आज महत्त्वाच्या नेत्यांचाच शपथविधी होणार आहे, त्यानंतर राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
एकनाथ शिंदे हे आज गोव्यावरून मुंबईत आले, त्यानंतर ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. या बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतरच फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते राजभवनाकडे निघाले.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे भाजपचे नेतेही शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.