Breaking: समृद्धी महामार्गावर भरावा लागणार इतका टोल… जाणून घ्या

महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास 8 तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची चर्चा सुरू आहे. याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

टोल दराची माहिती देणारे फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे 2025 पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट 701 किमी अंतरासाठी जवळपास 1200 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारणी होणार आहे. 

समृद्धी महामार्गावर मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी 1.73 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तर, हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी 2.79 रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी 5.85 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. त्याशिवाय, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 6.38 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.  अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी 9.18 रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त आसांची वाहने)  11.17 रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.

या जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्ग:
समृद्धी महामार्ग हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे.