
अहमदाबाद। दि. १२ जून २०२५: गुजरातच्या अहमदाबाद शहरात एक भीषण विमान अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एअर इंडियाचं एक प्रवासी विमान मेघानीनगर परिसरात कोसळल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे विमान रहिवासी भागावर कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या विमानात एकूण 242 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा देखील तात्काळ सक्रिय झाल्या आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून, सुरक्षा यंत्रणा नागरिकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खात्रीशीर तपशील उपलब्ध झालेला नाही.
हादरलेल्या नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत घटनेची माहिती दिली. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.