Amazon Prime New Price: ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन फी वाढवणार, जाणून घ्या नवीन दर
कोरोना काळात चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने लोकांमध्ये ओटीटी (OTT) बद्दल क्रेझ वाढत होती.
यामुळे, आजही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये नव्हे तर OTT द्वारे घरी बसून नवीन चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेणे पसंत करतात.
पण अलीकडेच या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
ॲमेझॉन प्राइमने (Amazon Prime) भारतातील आपले प्राइम मेंबरशिप फी 50 टक्क्यांनी वाढवून 1499 रुपये प्रति वर्ष करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 999 रुपये प्रतिवर्ष फी होती. बातमी अशीही आहे की, कंपनी दरमहा फी आणि तीन महिन्यांचे मेंबरशीप शुल्क देखील लवकरच वाढवणार आहे.
घोषणेनुसार, हे आहे नवीन शुल्क:
नेटफ्लिक्स, अॅपल, फ्लिपकार्ट आणि ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत ॲमेझॉन दरवर्षी 999 रुपयांमध्ये सर्वात स्वस्त मेंबरशीप देत होते. नवीन घोषणेनुसार वार्षिक मेंबरशीप शुल्क 999 रुपयांवरून 1499 रुपये केले जाईल. यासह, तीन महिन्यांची मेंबरशीप 329 रुपयांवरून 459 रुपये केली जाणार आहे. आणि महिन्याला 129 रुपयांची मेंबरशीप आता 179 रुपये होणार आहे. सध्या हा बदल कोणत्या तारखेपासून केला जाईल हे कंपनीने अद्याप सांगितले नाही.
देशात प्राइम मेंबरशिपची मागणी वाढली:
अमेझॉनचे म्हणणे आहे की यावेळी जो कोणीही प्राइम मेंबर आहे तो त्यांच्या मेंबरशीपची तारीख जाहीर होईपर्यंत चालू किमतीत त्यांची मेंबरशीप चालू ठेवू शकतो. मात्र, किंमतीत बदल झाल्यानंतर वापरकर्त्यांना नवीन किमतीत मेंबरशीप घ्यावी लागेल. युजर्सनी ही दरवाढ लागू होण्याअगोदर रिचार्ज केल्यास त्यांना सध्याच्या दरातच मेंबरशीप मिळणार आहे. प्राइम यूथ ऑफर किमतीत बदल झाल्यानंतरही लागू होईल. अमेझॉनने अद्याप या वाढीचे कारण स्पष्ट केले नाही. परंतु, देशातील प्राइम मेंबरशिपची मागणी जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. किंमती वाढल्याने ॲमेझॉन आपली सेवा सुधारण्याचा विचार करू शकतो. याच वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक चित्रपटही ॲमेझॉनवर रिलीज झाले आहे.