टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.
आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे. सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती.
सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या बाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.
या केसमध्ये सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्या बाबत फिर्यादींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.